नवी दिल्ली:
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशाच्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली. इस्रायल गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लासह सात आघाड्यांवर युद्ध लढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री गॅलेंट यांच्यात अनेकवेळा मतभेद निर्माण झाले आहेत. अशा स्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाच्या भोवऱ्यात असलेल्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे.
नेतन्याहू यांनी गॅलंटच्या जागी परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांना संरक्षण मंत्री केले. यापूर्वी, जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये गॅलेंट यांना हटविण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांच्या या निर्णयाविरोधात देशात निदर्शने झाली होती. पंतप्रधान नेतन्याहू यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपला निर्णय जाहीर केला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री पदावरून हटवल्यानंतर सांगितले की, “इस्रायलचे पंतप्रधान म्हणून माझी सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि आम्हाला निर्णायक विजयाकडे नेणे. ते म्हणाले, युद्धाच्या काळात आमच्यात विश्वासाचा अभाव होता. अशा परिस्थितीत देशाच्या सुरक्षेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागला.
सध्या इस्रायल सात आघाड्यांवर युद्ध लढत आहे, त्यातील गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्याविरुद्धची कारवाई ही सर्वात महत्त्वाची आहे. याशिवाय इस्रायलचे सैन्य इराण, सीरिया, इराक आणि हुथी बंडखोरांवरही मुकाबला करत आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधानांचा हा निर्णय धक्कादायक आहे. आता नेतन्याहू यांनी गॅलंट यांच्या जागी परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.