संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड : पशु पक्षी, प्राण्यांसह माणसांच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक आणि नायलॉन माजांच्या विक्रीला महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची दौंड मध्ये छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे दौंड पोलिस सतर्क झाले आहेत. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाचा वापर करताना कुणी आढळल्यास बंदी आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा दौंड पोलिसांनी दिला आहे.
दौंड पोलीसांच्या वतीने नागरिकांना व व्यावसायिकांना “नायलॉन मांजाला नाही म्हणा!” असे आवाहन करण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नका आणि कोणास वापरू देऊ नका गंभीर दुखापत होऊन जीव गेल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो असे दौंड पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना सांगण्यात आले आहे. नायलॉन मांजा वापरणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करणार आहे, असा इशारा पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिला आहे.
मकर सक्रांत मुळे दौंडच्या आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसू लागले आहे. परंतु ही पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात व माणसांच्या जीवावर बेतू शकते.
राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असते. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर दौंड पोलिसांची बारीक नजर असेल.त्यामुळे दौंडकरानों वेळीच सावध व्हा.