वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड | विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या दोषी व्यक्तींची गय केली जाणार नाही, त्या दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक पवार म्हणाले की, दौंड पोलीस स्टेशन भागातील ७८ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून वैयक्तिक लेखी स्वरूपात बाँड लिहून घेण्यात आला आहे, दोषींनी जर निवडणुकींच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ५४ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधक कारवाई व्हावी, म्हणून दौंड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यांचा होकार मिळाल्यावर संबंधित व्यक्तींवर तडीपारची कारवाई करणार.तसेच निवडणुकीदरम्यान जर कोणाला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास होत असेल किंवा यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याबाबत दौंड पोलीस स्टेशन किंवा मला फोन द्वारे संपर्क करून तक्रार करावी. याबाबत कोणाच्याही नावाचा उल्लेख होणार नाही किंवा संबंधित व्यक्तीला माहिती होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, संबंधित कार्यवाही ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.