वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात महाराष्ट्रातील जनतेने मतांच्या रुपात भरभरुन दान टाकले. महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळाले.
त्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राज्यात कोणाला मंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान दौंड शहरातील कार्यकर्त्यांनी दौंड नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाला महाअभिषेक व महाआरती करत राहुल कुल यांना कॅबिनेट मंत्री पद मिळू दे;असे साकडे श्री काळभैरवनाथाला घालण्यात आले आहे. याप्रसंगी सौ व श्री. नरेश सोलंकी,सौ व श्री. विशाल मुनोत,सौ व श्री. सचिन बोरा यांच्या हस्ते ग्रामदैवताला महाभिषेक करण्यात आला.
राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा होताना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती व कोणते मंत्री पद जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे दौंड मधील कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावे अशी प्रार्थना देवाकडे केली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच राहुल कुल यांच्या मंत्रिपदासाठी दौंड तालुक्यातील जनता आग्रही आहे.तसेच राहुल कुल यांना मंत्री पद मिळू दे म्हणून दौंड मध्ये कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे.
महाअभिषेक सोहळ्यासाठी नितीन अष्टेकर, दत्तात्रय जमदाडे, अनिल ढोरगे, शौर्य पाटील, बालाप्रसाद मंत्री, राजेंद्र मुथा, घिसु शेठ जैन, अमोल काळे, रामेश्वर मंत्री, नंदकिशोर मंत्री, निखिल वाघमारे, प्रथमेश साठे उपस्थित होते.