पाटस प्रतिनिधी / योगेश राऊत
पाटस : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने दि. 15/10/2024 पासून ते दि. 25/11/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान दि. 20/11/2024 रोजी व निकाल दिनांक 23/11/2024 रोजी जाहीर होणार आहे.
कोणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत.
तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. रंग, गुलाल उधळणार नाही. संबंधित विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत.
सर्व व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत, जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल या संदर्भात यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी माहिती दिली.