संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
फोटो उशिरा दिल्याचा राग मनात धरून दोन युवकांनी हरि ओम कलर लॅब फोटो स्टुडिओ मधील एका छायाचित्रकाराला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड येथे घडली असून, या प्रकरणी दोन युवकांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाचित्रकाराला मारहाण करतानाची सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी श्रीकांत अनिल घोडके (राहणार,भीमनगर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, हि घटना बुधवारी ११ जून रोजी दुपारी १:१५ मिनिटांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय समोरील हरि ओम कलर लॅब फोटो स्टुडिओ येथे घडली. सदर आरोपी हरि ओम कलर लॅब फोटो स्टुडिओ मध्ये आला असताना माझे फोटो तयार झाले आहेत का अशी विचारणा केली असता फिर्यादी यांनी अजून थोडा वेळ लागेल असे सांगितले. आपल्या फोटोला उशिरा लागला, हा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केली. नंतर आरोपीने आपल्या भावाला बोलावून घेऊन दोघांनी मिळून फिर्यादीला मारहाण केली. डोक्यात लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला जबर जखमी केले. तू ज्या एरियात राहतो तिथे येऊन तुला मारीन अशी जबर धमकी देत आरोपी तिथून निघून गेला.
फोटोग्राफरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेरा मधील आरोपींची ओळख पटली असून लवकरच आरोपींना अटक करू अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.