संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या वराहांमुळे (डुकरांमुळे) घाण व मुलांच्या सुरक्षेसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये नागरिकरण झपाट्याने वाढले असून त्यामुळे खुली जागा कमी झाली असून येथील नगरपालिका कार्यक्षेत्रात मोकाट वराहांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याच्या बाजूला सतत वराहांचे वास्तव्य दिसत आहे. त्यामुळे घाणीसह नागरिकांच्या आरोग्याचा व लहान मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
दौंड नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात वराह (डुक्कर) पालन केले आहे, यांचा मुक्तपणे सगळीकडे वावर आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वराह जनावरे मोकाट वावरत आहेत. अवैधरित्या वराह पालन करणाऱ्या वराहांचा (डुक्करांचा) बंदोबस्त करावा, अशी मागणी दौंड शहर पतित पावन संघटनेकडून करण्यात आली आहे.
अवैधरित्या फिरणाऱ्या मोकाट वराहांवर व त्यांच्या मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पतित पावन संघटनेचे दौंड शहर अध्यक्ष केदार इंगळे यांनी केली आहे. त्यासंदर्भात दौंड नगरपालिका तसेच दौंड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर कारवाई केली नाही तर शुक्रवारी २० जून रोजी दौंड शिरापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे इशारा पतित पावन संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.