संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्रोत, देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. सावरकरांनी पूर्वापार चालत आलेली रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. आधुनिकीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि त्यांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. समाज जागृती, समाज प्रबोधनासाठी त्यांनी नाटके लिहिली, पोवाडे लिहिले असे महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दौंड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीजवळील प्रस्तावित सावरकर स्मारकाजवळ अभिवादन करण्यात आले.
कोविड काळापासून रखडलेल्या स्मारकाच्या दुरुस्ती व विविध अपूर्ण कामांसाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे इतके वर्ष रखडलेल्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पूर्ण केली जाणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे स्मारक एक महान स्वातंत्र्यसैनिक, कवी, लेखक, तत्त्ववेत्ता आणि भाष्यकार असलेल्या वीर सावरकरांना समर्पित आहे. त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि त्यांना अंदमानच्या काळ्या पाण्याची ११ वर्षे, तर रत्नागिरीत दोन वर्षे सहा महिने नजरकैदेत राहावे लागले होते. जयंतीनिमित्त आमदार राहुल कुल यांनी प्रत्यक्ष स्मारकस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल,अशी आमदार कुल यांनी ग्वाही दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे पाटील, डॉ हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिनोलीकर, माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया, ॲड. सुधीर गटणे, श्रीराम ग्रामपुरोहित, अर्चना साने, अरविंद गोलांडे, श्यामकांत वाघमारे, मंडलकर (निवृत्त स्टेशन मॅनेजर) यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.