संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड – दौंड शहरांसह तालुक्यात नामदेव शिंपी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून समाजासाठी आतापर्यंत एकही हक्काचे सांस्कृतिक भवन नाही. संत नामदेव शिंपी समाजातील नागरिकांच्या वतीने सांस्कृतिक समाजभवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दौंड शहरांसह वेगवेगळ्या भागांत राहात असलेला शिंपी समाज आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजाचे सांस्कृतिक वैभव टिकून राहावे, शिंपी समाजाच्या तरुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, रोजगार मेळावे घेता यावेत, विविध उपक्रम आयोजित करता यावेत, यासाठी हक्काचे सांस्कृतिक समाजभवन बांधून मिळावे अशी संत नामदेव शिंपी समाज बांधवांची इच्छा आहे.
संत नामदेव महाराज यांच्या शष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा पंढरपूर येथे साजरा करण्यात येणार आहे,त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल कुल यांनी पंढरपूर येथे उपस्थित रहावे यासाठी संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी आमदार राहुल कुल यांची राहु (ता.दौंड) येथे सदिच्छा भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
यावेळी संत नामदेव महाराज शिंपी समाज दौंड यांच्यावतीने आमदार राहुल कुल यांना विविध मागण्यांचे निवेदन हि देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात दौंड शहरामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे. संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह. भ. प निवृत्ती महाराज नामदास यांची पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर नियुक्ती करण्यात यावी. संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य या महामंडळामध्ये दौंड तालुक्यातील शिंपी समाजाचा प्रतिनिधी नेमावा,इत्यादी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी शिंपी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी संत नामदेव महाराज शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धेश हिरवे, दौंड तालुका शिंपी समाज अध्यक्ष गजानन चुंबळकर, उपाध्यक्ष रतन बोधे, विजय बारटक्के, संजय धोकटे, अमित हेंद्रे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.