संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येकाच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत बसली आहे. शहरातील कचराकुंड्या, उकिरडा, रेल्वे स्थानक, चौकात, शाळा पटांगण, गल्ली-बोळात,सोसायटी, सार्वजनिक ठिकाणांचा भटक्या कुत्र्यांनी ताबा घेतल्याचे दिसून येते. यामुळे शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. यासंदर्भात संविधान हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष बाबा करीम शेख यांनी या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी दौंड नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
नुकतेच भटक्या कुत्र्यांनी शहरातील खाटीक गल्ली परिसरातील चार वर्षाचा मुलगा मुजम्मिल कुरेशी याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. अशा घटना दौंड मध्ये वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, तसेच सामान्य नागरिक यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
दौंड शहर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हौदोस मांडला आहे. रात्री- अपरात्री रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले असून चालतच नव्हे, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा भटके कुत्रे पाठलाग करतात. यामुळे तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संविधान हक्क संरक्षण समितीकडून करण्यात आली आहे.