संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — शहरामध्ये नवीन बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली. एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी अजून पाण्याकरिता टाकी बसविण्यात आली नाही.आजच्या सद्य:स्थितीत पाणी उपलब्ध नसल्याने शौचालय, मुतारी बंद अवस्थेत आहे. बसस्थानकावर येणाऱ्या महिला व पुरुषांकरिता सुलभ शौचालय बांधण्यात आले. परंतु तेथे पाणीच नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला तरी पाण्याचा मुबलक सुविधा उपलब्ध नसल्याने शौचालय बंद अवस्थेत आहे. शौचालय अभावी महिलांची कुचंबना होत आहे. नवीन बसस्थानकावरील शौचालयात पाणी नसल्याने महिला व पुरुष प्रवासी, शालेय विद्यार्थिनी आदींना अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन एसटी स्टँडवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने एसटी स्टँड तळीरामांचा अड्डा बनला आहे.त्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या सुरु असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासन व एसटी महामंडळाने लक्ष घालून प्रवाशांची समस्या दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दौंड नगरपालिकेने नवीन एसटी स्टँडवर एक बोअरवेल व सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विजय कावळे यांच्याकडे केली आहे. नगरपालिकेने तात्काळ एसटी स्टँडवर बोअरवेल उपलब्ध करून द्यावा, केवळ बघ्याची भूमिका न घेता पुढील कार्यवाही करावी.अन्यथा २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे, बालाप्रसाद मंत्री, कैलास जोगदंड यांनी दिला आहे.