संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करत आहेत. या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून या प्रकाराची चौकशी करावी. दौंड नगरपालिकेच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी. अन्यथा, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक जिवराज पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
माजी नगरसेवक जिवराज पवार नगरपालिकेच्या कारभाराबाबत निवेदनात म्हणाले की, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांच्याकडून गलथान, मनमानी कारभार सुरू आहे.
लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही पध्दतीने काम सुरू आहे.
दौंड नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून पाच वर्षांपूर्वी ४० लक्ष निधी खर्च करुन पाण्याची टाकी बांधण्यात आली. पाण्याची टाकी भरण्यासाठी पाइपलाईन नाही त्यामुळे पाण्याची टाकी भरता येत नसल्याने या भागातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी मुख्याधिकारी यांना भेटून सुध्दा पुढे काही हालचाल होत नाही. पाणीपुरवठा विभाग निविदा अंतर्गत सूचना प्रसिद्ध केली.परंतु टेंडर अपलोड करणे प्रक्रिया राजकीय दबावाला बळी पडून थांबविली आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम मुख्याधिकारी करत आहे असा गंभीर आरोप माजी नगरसेवक जिवराज पवार यांनी केला आहे.
तसेच घनकचरा संकलन व व्यवस्थापन टेंडर प्रक्रिया वेळेत करणे आवश्यक असताना मात्र मुद्दाम विलंब करत आहेत. त्यामुळेच शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत.त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे. घनकचरा संकलन टेंडर प्रक्रिया वीस दिवस होऊन गेले तरी आजपर्यंत त्यावर पुढील कारवाई केली नाही यामध्ये मुख्याधिकारी यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे आणि नागरिकांना वेठीस धरले जात आहे.या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांसाठी मला अखेर रस्त्यावर उतरावे लागेल आणि मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जन आंदोलन करावे लागेल असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माजी नगरसेवक जिवराज पवार यांनी म्हटले आहे.