संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड : दौंड तालुक्यातील यवत आणि वरवंड येथील संत तुकाराम महाराज पालखी तळाला आमदार राहुल कुल यांनी भेट देवून पाहणी केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता हरिश्चंद्र माळशिकारे, मयूर सोनवणे, चेतन शिंदे, वन परीक्षेत्र अधिकारी राहुल काळे, यवतचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, बाळासाहेब लाटकर, नाना महाराज दोरगे, इम्रान तांबोळी, गणेश शेळके, वरवंडचे माजी सरपंच गोरख दिवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर, बाजार समिती संचालक अशोक फरगडे, खरेदी विक्री संघ संचालक सचिन सातपुते उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २३ जून रोजी यवत व २४ जून रोजी वरवंड येथे मुक्कामी येणार आहे. या पारर्श्वभूमीवर यवत व वरवंड येथील पालखी तळावर प्रशासन आणि गावकऱ्यांच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे. येथील पालखी तळाला आमदार राहुल कुल यांनी भेट देवून पालखी तळ परिसराची पाहणी केली. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांकडून पाणी, वीज, रस्ते व स्वच्छता आदींची माहिती आमदार कुल यांनी जाणून घेतली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वीज, पिण्याच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच पालखी मार्गावरील अनावश्यक झाडे – झुडपे काढून टाकावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, जलसंपदा विभागाने व पाणीपुरवठा विभागाने यंत्रणा तैनात ठेवावी, पंचायत समिती व आरोग्य विभागाने फिरते शौचालय, अतिदक्षता विभागाने रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी केंद्र,पालखीतळाची स्वच्छता व आवश्यक ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, वनविभागाने पालखी मार्गावर वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे, पथदिव्यांची सोय करत आपत्कालीन कक्ष उभारावा, पोलिसांनी वारीच्या दरम्यान चोरीचे प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच पावसाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन वारकरी व भाविक भक्तांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
दौंड तालुका वारकरी भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.