वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड — दौंड शहरातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांचे स्मारक लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले होते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पणत्या, विद्युत रोषणाई, पेटत्या मशाली शिवरायांचे ऐतिहासिक पोवाडे यामुळे अवघा परिसर शिवमय झाला होता.
यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी शिवरायांना मानवंदना दिली.येथील शिवस्मारक समिती, शिवजयंती उत्सव याचबरोबरीने शिवभक्तांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात सुशोभित रांगोळ्या काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. रांगोळीतून नयन मनोहरी शिवरायांची व संभाजी महाराजांची प्रतिमा रेखाटण्यात आली होती. मयुरी कुलथे, शुभांगी कदम, साक्षी कदम, प्रतिक्षा गायकवाड , मयुरी राऊत, तेजल सोनवणे या कलावंतांनी रांगोळी काढली होती. दरम्यान दीपोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. याच बरोबरीने शहरातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री दत्तपीठ दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन महाराज मंदिर यासह विविध ठिकाणी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळी पहाट निमित्ताने येथील स्वरांगण संगीत विद्यालयाचे प्रमुख आणि ज्येष्ठ संगीतकार निलेश पारखी यांच्या पुढाकाराने भावगीत, भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी गायक आणि वाद्य कलावंतांचा सत्कार केला.