संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — महावितरण कार्यालयावर दौंड शहर काँग्रेसने हल्लाबोल करत हटके आंदोलन करून महावितरण कार्यालयीन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी गाढवावर काळे कापड टाकून त्यावर ‘मी दौंड शहर महावितरण’ असा प्रतिकात्मक मजकूर लिहून गाढवाची वाजतगाजत महावितरण कार्यालयावर दौंड शहर काँग्रेस कमिटीने मोर्चा काढला. दौंड शहरात कामाच्या नावाने वारंवार होणारे अघोषित भारनियमन त्वरित बंद करावे, अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दौंड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरेष ओझा यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी दौंड शहर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दौंड महावितरण अभियंता यांची भेट घेऊन निवेदन दिले. दौंड शहरात कामाच्या नावाने होणारे अघोषित भारनियमन त्वरित बंद करण्यात यावे, विज दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची निकृष्ठता तपासून उच्च व शासनमान्य दर्जाचे साहित्य वापरण्यात यावे, दौंड शहरातील एखादया भागात वीजसमस्या निर्माण झाल्यास इतर भागांतील वीज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांची प्रत्येक भागात जोडणी व्हावी, शहरातील वीज समस्या व उपाय निवारण्यासाठी स्थानिक नागरीक व अधिकारी यांची एक समिती स्थापन करून दर एक- दोन महिन्याला समितीची बैठक घेण्यात यावी.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गाढवाचा प्रतिकात्मक मोर्चा वाजतगाजत महावितरण कार्यालय आवारात दाखल झाला. शहराचा कारभार सुधारला नाही आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची गाढवावरून वरात काढू, असा इशारा ओझा यांनी दिला.
निवेदनावर हरेष ओझा, तन्मय पवार, अतुल थोरात, रज्जाक शेख, अतुल जगदाळे, विठ्ठल शिपलकर, श्रेयश मुनोत यांच्या स्वाक्षरी आहेत.