संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड शहरामध्ये गेल्या पाच महिन्यापासून गाव वेशी जवळील हनुमान मंदिर परिसरातील एक ड्रेनेज चेंबर चोक अप झालेले होते याच ठिकाणी भाजी मंडई आठवडी बाजार भरतो, तसेच हिंदू स्मशानभूमी व भिमा नदीकडे जाणारा एकमेव रस्ता पुर्णपणे मैलामिश्रित घाण पाण्याने वाहत होता. भाजी मंडई येथे आलेले नागरिक, मंदिरात आलेले भाविक, अंत्ययात्रा व त्यासोबत येणारे नागरिक, भिमा नदीच्या दशक्रिया विधीसाठी येणारे नागरिक यांना याच घाण पाण्यातून चालत जावे लागत होते. तुटलेले ड्रेनेज चेंबर दुरुस्त करण्यात यावे या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून स्थानिक नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून आणि लेखी निवेदन देऊन देखील नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
गटारीच्या चेंबर मधून रस्त्यावर येणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यातून नागरिकांना ये- जा करावी लागत होती. मैलामिश्रित सांडपाणी बंद करावे अशी मागणी नगरपालिका प्रशासनाला वारंवार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने याच गटारीच्या पाण्यात बसून मनसेचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे व शिवसेनेचे (ठाकरे गट) दौंड तालुका संघटक संतोष जगताप तसेच परिसरातील स्थानिक महिला-भगिनींनी आंदोलन केले.
या आंदोलनावेळी माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी नगरपालिका प्रशासनाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला व नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध केला.