संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — दौंड तालुक्यातील सोनवडी मध्ये कत्तलीसाठी आणलेल्या सोळा गायींची दौंड पोलीसांकडून सुटका करण्यात आली. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीच्या साह्याने पोलिसांनी कारवाई करून गायींची सुटका केली.
दौंड – काष्टी रोडवरील सोनवडी फाट्यावर धनश्री हॉटेल जवळ (ता.१८) रोजी ही कारवाई करण्यात आली. रस्त्यालगत असणाऱ्या दाट झाडीमध्ये कत्तलीसाठी गाई बांधण्यात आल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यावेळी गोरक्षकांनी ११२ या क्रमांकावर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला.
गायींची चारा पाणी व औषधोपचाराची कोणतीही सोय न करता गायींना बांधून ठेवण्यात आले होते. दौंड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत १६ गायींची सुखरूप सुटका केली.
दौंड पोलीस स्टेशन मध्ये आकाश भैसडे (रा. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार अजिम कुरेशी, तन्नू इस्माईल कुरेशी,वाजीद सादिक कुरेशी, बब्या कुरेशी, कुमेल जब्बार कुरेशी यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील विविध कलमान्वये या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या १६ गायींची एका गोशाळेत रवानगी करण्यात आली.